09/04/2025
सोबतची व्हिडिओ क्लिप ही आपल्या शेतातील सेंद्रिय, गावरान हळदीची आहे. ही शेंदुरजनाघाट परिसरातील पारंपरिक जात आहे . उत्तम कर्कुमिन टक्केवारी (5.06%w/w) असलेली ही जात पुरेसे ब्रॅण्डिंग न झाल्याने थोडी दुर्लक्षित झाली आहे. आपण 'सुगंधा' असे नामकरण करून थेट ग्राहकांना याची विक्री करत आहोत.
दोन क्रेट ओल्या हळदीपासून सुरू झालेला हा प्रवास 2 ट्रॉली पर्यंत पोचला आहे. यावर्षीचे उत्पादन पाहून ओल्या हळदीच्या वजनाबाबत अंदाज नसल्याने ट्रॅक्टर घेऊन थेट धरमकाटा गाठला. यावर्षी, एक एकर पेक्षा थोड्या कमी जागेत 40 क्विंटल उत्पादन मिळाले. (सेलमच्या तुलनेत हे कमी आहे, मात्र सेलमला दर बरेच कमी मिळतात.) सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्याने स्वतःच्या उत्पादनाचे वजन करण्यासाठी धरमकाटा गाठणे हा माझ्या दृष्टीने सेंद्रिय शेतीच्या प्रवासातील आत्मविश्वास वाढविणारा महत्वाचा टप्पा आहे. गेल्या 40 वर्षांच्या प्रवासात सेंद्रिय शेती मध्ये वृक्षशेती, फळशेती (संत्रा सोडून) मध्ये यश मिळविणे हा टप्पा गाठणे तुलनेत लवकर घडले. मुळा खोल जातात, बारमाही असल्याने ओलावा टिकून राहतो, त्यामुळे जिवाणू पूर्ण मरत नाहीत, झाडाचा स्वतःचा पालापाचोळा खाली पडतो, कुजतो आणि झाडाला खत मिळते, वरून शेणखत टाकले तर उत्तमच. मात्र या गोष्टी धान्यशेतीत, कंदशेती या बाबतीत कठीण आहेत. वरच्या 6 इंचात वर्षानुवर्षे पीक घेतले जाते. खालच्या थरातील सूक्ष्मअन्नद्रव्ये वर आणण्यासाठीची क्षमता या पिकांमध्ये नाही. जमीन उन्हाळ्यात तापते, बायोमास मोठ्या प्रमाणात दरवर्षी शेताबाहेर जातो, तो शेणखताच्या स्वरूपात परत येईलच असे नाही. इ. कारणांमुळे उथळ मुळांच्या पिकात यश मिळविणे कठीण जाते. जमीन बनायला वेळ जातो, शेती सेंद्रिय असो की रासायनिक,अर्थपुरवठा हा महत्त्वाचा मुद्दा असतोच, अनेकदा तो सोडवता न आल्याने पिक मार खाते. आमच्या लहानपणात रासायनिक शेती तशी जोरात होती, तेव्हा वडिलांनी काडीकचऱ्याची, ताणाची शेती सुरू केली, त्यांना टोमणे मारणे शक्य नसल्याने मजूर, शेजारी शेतकरी, कुटुंबीय यांचे टोमणे मारण्यासाठीचे हक्काचे लक्ष्य दादा आणि मी होतो. त्यामुळे बालपण बऱ्यापैकी न्यूनगंडाचा सामना करण्यात गेले आहे. या पार्श्वभूमीवर 35 गुंठ्यात दोन ट्रॅक्टर हळद निघाल्यावर होणारा आनंद (हवं तर हलकासा आसुरी म्हणा😃) काही वेगळाच आहे.
चिन्मय फुटाणे