18/06/2026
काय गंमत आहे नाही... व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, व्यक्ती तितक्या प्रकृती!
आमचे तीन व्यवसाय आहेत – Rustic Holidays, Rustic Recipies - Rasmatru आणि Rustic Arts. हे तिन्ही व्यवसाय करताना विविध स्तरांतील, विविध स्वभावांची आणि विविध ढंगांची माणसं भेटत असतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी, तिची विचार करण्याची पद्धत वेगळी आणि वागण्याची रीतही वेगळी.
कधी कधी माणसं दिसतात तशी नसतात आणि कधी दिसत नाहीत तशी निघतात. एखाद्या दिवशी आपण फोनवर बोलत असताना त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी घडलेले असू शकते. त्याचा परिणाम तिच्या बोलण्यात किंवा वागण्यात दिसतो. त्यामुळे आता मी लोकांना लगेच judge करायचे सोडून दिले आहे.
परवाच एक छोटासा अनुभव आला.
एका ग्राहकाने Rasmatru ची ऑर्डर दिली होती. नेमके त्यावेळी लाल तांदूळ संपले होते. पॅकिंग करताना त्यांच्या receipt वर त्याचे पैसे कमी केले गेले. पण माझ्या वहीत नोंद करताना मूळ बिलाची रक्कम लिहिली गेली.
पार्सल पोहोचल्यानंतर त्यांना लक्षात आले की लाल तांदूळ आलेले नाहीत. त्यांनी मला मेसेज केला –
"मला लाल तांदूळ संपले आहेत असा निरोप receipt वर लिहिला आणि तरीही तुम्ही त्याचे पैसे माझ्याकडून घेतले आहेत. ताबडतोब माझे पैसे परत करा आणि स्क्रीनशॉट पाठवा."
मी मेसेज वाचला. शांतपणे पैसे परत पाठवले. सॉरी म्हटले आणि विषय तिथेच संपवला.
कारण व्यवसाय करताना एक गोष्ट शिकले आहे – तोंडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो!
खरं तर आमची पद्धत थोडी वेगळी आहे. ऑर्डर आल्यावर receipt बनते, सामान पॅक होते, पोस्टात जाते. त्यानंतर पोस्टाचे बिल आल्यावर आम्ही ग्राहकांना अंतिम हिशोब पाठवतो. म्हणजे सामान आधी पोहोचते आणि पैसे नंतर मागितले जातात.
काही जण म्हणतील, "यात रिस्क आहे."
हो आहे. कोणी फसवूही शकते. पण आजपर्यंतचा अनुभव सांगतो की जगात चांगली माणसं जास्त आहेत. माझा ठाम विश्वास आहे की प्रेमाने आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाला प्रेमानेच प्रतिसाद मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचा गोपाळकृष्ण आमच्या पाठीशी आहे.
आता यातही व्यक्ती तितक्या प्रवृत्ती दिसतात.
काही जण हिशोबाचा मेसेज जाताक्षणी पैसे पाठवतात. काही जण त्याच दिवशी पाठवतात. काही जण पार्सल मिळाल्यावर पैसे पाठवतात. काही जण आधीच विचारतात, "पार्सल मिळाल्यावर पैसे पाठवले तर चालेल का?" आणि मीही आनंदाने "हो" म्हणते.
अर्थात, एखाद्या-दुसऱ्याला आठवण करून द्यावी लागते. पण असे लोक फारच कमी असतात.
काही ग्राहक ऑर्डर देताना इतक्या प्रेमाने बोलतात की मन भरून येते. काही जण इतके कोरडे बोलतात की वाटते, "यांना काही पाठवूच नये!" तर काही जण वस्तू मिळाल्यावर इतके भरभरून कौतुक करतात की पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावेसे वाटते.
आणि म्हणूनच वाटते...
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, व्यक्ती तितक्या प्रकृती!
प्रत्येक माणूस आपापल्या अनुभवांनी, परिस्थितीने आणि स्वभावाने घडलेला असतो. आपण मात्र आपले काम प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि हसतमुखाने करत राहायचे. बाकी सगळे त्या वरच्याच्या हाती सोडायचे!
व्यवसायातून नफा मिळतोच, पण माणसं वाचायला शिकायला मिळणं हा त्याहून मोठा फायदा असतो.
शिल्पा नितिन करकरे.
तूरळ.संगमेश्वर.