27/03/2026
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना 'शबरी नॅचरल्स'च्या प्रीमियम उत्पादनांची भेट;
आदिवासी विकास विभागाच्या उपक्रमांचे कौतुक
लोकभवन, मुंबई :
राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची 'लोकभवन' येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शबरी नॅचरल्स' या ब्रँडच्या प्रीमियम उत्पादनांचा विशेष संच राज्यपालांना भेट देण्यात आला.
या बैठकीला आमदार हरिश्चंद्र भोये, राजेश पडवी, भीमराव केराम, केवळराम काळे, राजू तोडसाम आणि माजी मंत्री राजेंद्र गावित, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड (भाप्रसे), आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या संचालक मंजिरी मनोलकर (भाप्रसे), सहसंचालक मच्छिंद्र शेळके, महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ तसेच आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड व आदिवासी विकास संशोधन संस्थेच्या संचालक मंजिरी मनोलकर यांनी आपापल्या विभागांच्या कामाचे सादरीकरण केले.
आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या नैसर्गिक आणि दर्जेदार उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 'शबरी नॅचरल्स' हा ब्रँड प्रभावी कामगिरी करत असल्याची माहिती यावेळी मंत्री महोदयांनी दिली. यासोबतच आदिवासी संस्कृती दर्शविणारी नियोजिका आणि लाभार्थ्यांच्या यशकथांवर आधारित 'कॉफी टेबल बुक' देखील राज्यपालांना प्रदान करण्यात आले.
"महिला स्वयं-सहायता गट हे महिला सक्षमीकरणाचे एक मोठे आंदोलन आहे," असे नमूद करत त्यांनी आदिवासी विभागातील बचत गटांची संख्या आणि त्यांच्या कार्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागाला दिल्या. तसेच, आदिवासी भागातील क्षयरोग निर्मूलन आणि महिलांमधील ॲनिमिया या विषयांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्यावर आधारित लघु पुस्तिका, लघु नाट्य आणि पथ नाट्य तयार करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. यामध्ये आदिवासी कवी, गायक आणि कलाकारांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. "राज्यातील आदिवासी लेखक, पर्यावरण कार्यकर्ते आणि कलाकारांना लोकभवन येथे चर्चेसाठी घेऊन यावे," अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्याला प्रथमच आदिवासी समाजातील राज्यपाल लाभल्यामुळे आदिवासी जनतेच्या समस्यांचे जलद निराकरण होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.