10/06/2026
अंजनवेल मधली जैवविविधता आणि काजवे!
अंजनवेल आणि काजवे हे समीकरण गेल्या काही वर्षांत छान रुजलय.
गेल्या सुमारे २० वर्षांत इथे प्रचंड संख्येनं झाडं लावली गेली, ती सांभाळून वाढवली गेली. झाडं लावताना, आपल्याला त्यांच्याकडून काय मिळेल, असा स्वार्थी विचार कधीच नव्हता, त्यामुळं अगदी जंगलात वाढतात, तशीच, रानात सहज उगवणारी, वाढली की शिळींब च्या एखाद्या डोंगररांगेतील स्वाभाविक पणे जस रान बहरलं
असतं, अगदी तसंच वाटेल अशी, स्थानिक झाडं.
त्यात भेरली माड, जांभूळ, बांबू, हिरडा बेहडा, कांचन, रानभेंड
अशी नाना तऱ्हेची झाड इथ रूजली.
सोबतभरपूर पक्षी आले, कोळी, मुंग्या , वाळवी, फुलपाखरं, सरडे सगळं बहरायला लागलं. झाडांची कीटकांची एकमेकांसोबत सुरेख जीवनयात्रा सुरू झाली.
त्यामुळं पाऊस संपला की आवर्जून दिसणारे जायंट वूड स्पायडर असो, किंवा पावसाच्या उंबरठ्यावर दिसणारे फॉक्स ब्रश ऑर्किड, किंवा ऐन पावसात फुलणारं विलक्षण सुन्दर फुल _ज्याचं नावच इंग्रजांनी 'क्विन ऑफ खंडाळा' असो.
याच यादीतला, एक विशेष घटक म्हणजे काजवे!
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अंजनवेल परिसरातली काजव्यांची संख्या वाढते आहे.
अगदी पर्यटकांच्या निवासी खोल्यांना लागून असलेल्या झाडांवर पावसा आधी काही दिवस काजव्यांचा लखलखाट दिसत राहतो.
पूर्वी करंजाच्या झाडांवर प्रामुख्याने दिसणारी काजव्यांची रोषणाई आता ऐन, रानभेंड, पांढरा शिरीष आणि बांबू वर पसरली आहे.
काजव्यांच आयुष्य जेमतेम १५-२० दिवसांच. त्यात त्याचं जे चमकणं आहे, ते काही आपल्याला छान वाटावं म्हणून नव्हे तर, त्यांच्या पुढच्या प्रजेसाठी, आपल्या प्रजातीच्या सुयोग्य सक्षम जोडीदाराच्या निवडीसाठी केली जाणारी निसर्गाचीय विशिष्ठ योजना आहे.
आपल्या नजरेला सुखावणारा हा सोहळा, अत्यंत जबाबदारीने पहावा, त्यातून आपलेही निसर्ग भान जागे रहावं, निसर्गाच्या अशा घटकांच्या संवर्धनासाठी आपणही काही योगदान द्यावं, ह्या दृष्टीने आपण अंजनवेल मध्ये प्रयत्न करत आहोत.
ह्या २ ते ३ आठवड्याच्या काळात परिसरातले सर्व दिवे रात्री बंद राहतील, याची काळजी घेतली जाते. अगदी जिथे आवश्यक तिथंच मोजके लाइट्स काही काळासाठी आपण सुरू ठेवतो.
काजव्यांचे जे होस्ट प्लांट म्हणजे मातृ वृक्ष आहेत, त्या परिसरातली माती, तिथला पालापाचोळा आहे, त्याच स्थितीत कायम राखला जातो. अंजनवेल परिसरात कुठल्याही कीटकनाशकांच्या फवारण्या कधीही केल्या जात नाहीत. त्यामुळं काजव्यांच्या अळ्या/अंडी सुप्तावस्थेत असतानाही वर्षभर त्यांना संरक्षित वातावरण मिळतं.
यंदा चा काजवांचा दीपोत्सव आता अंतिम टप्प्यात आहे.